जनकल्याण समितीतर्फे हिंदू धर्मियांमध्ये आचार, विचारांचा प्रसार – भैय्या जोशी

पी.एन.पी. नाट्यगृहात “पू. श्रीगुरुजी पुरस्कार” प्रदान
। अलिबाग । वार्ताहर ।

रा.स्व.संघ जनकल्याण समिती ही हिंदू धर्मियांमध्ये आचार-विचारांचा प्रसार वाढविण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन रा.स्व.संघ माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. रा.स्व.संघ जनकल्याण समितीमार्फत दरवर्षी राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या दोन व्यक्ती अथवा संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील पू. श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या पुरस्कार प्रदानाच्या 27 व्या वर्षीचा सोहळा रविवारी (दि.20) पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे पार पडला. सकाळी ठीक 10.30 वाजता या सोहळ्याला प्रारंभ झाला. तर, यंदा हे पुरस्कार धर्मसंस्कृती व अनुसंधान या विषयांसाठी प्रदान केले गेले.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जीवनविद्या मिशन प्रमुख प्रल्हाद वामनराव पै कुलाबा जिल्हा संघचालक व स्वागत समिती अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते उपस्थित होते.

यावर्षीचा पू. श्रीगुरुजी पुरस्कारयावर्षी धर्मसंस्कृती विषयाचा पुरस्कार पूर्वांचलमध्ये भारतीय संस्कृतीचे जतन करणार्‍या आसाम प्रांतातील ऑल बाथौ महासभा या संघटनेला प्रदान केला गेला. 1 लाख रूपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व गौरव चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ही संघटना पूर्वाचलातील सातही प्रांतमधील 25 लक्ष लोकसंख्या असलेल्या बोडो जनजातीमधील समाजामध्ये स्वधर्म जागृती व संस्कृती संवर्धनाचे कार्य करीत असते. ऑल बाथौ महासभेच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस गणेश दैमरी यांना हा पुरस्कार देण्यात आला. अनुसंधान विषयाचा पुरस्कार पुनरुत्थान विद्यापीठ कर्णावती गुजरातच्या कुलपती इंदूमती काटदरे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना भैय्या जोशी यांनी भय्याजी जोशी यांनी आपल्या भाषणातून गोळवलकर गुरुजींच्या जीवनकार्याची माहिती दिली.तसेच गुरुजींच्या जीवनात घडलेले अनेक प्रेरणादायी प्रसंगही त्यांनी सांगितले. गोळवलकर गुरुजी त्यावेळी जे बोलले होते ते आज घडताना दिसत आहे असेही ते म्हणाले. गोळवलकर गुरुजींना अखेरीस कर्करोग झाला होता. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना माझ्याकडे नेमका किती वेळ शिल्लक आहे कारण मला अजून बरीच योजलेली कामे पूर्ण करायची आहेत असा धाडसी प्रश्‍न केला. आपल्याला आपल्या जीवनाचा अंत कोणत्या दिवशी होणार आहे हे माहित नसल्याने आपण आनंदी जीवन जगत आहोत. परंतु अंत माहित असतानासुद्धा योजलेल्या कार्याशी तत्पर राहून आनंदाने कसे जगावे याचे उदाहरण म्हणजे गोळवलकर गुरुजी होते असेही ते म्हणाले.

जनकल्याण समितीच्यावतने वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:च्या अभ्यासाच्या बळावर कार्य करणार्‍या लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अशा लोकांना शोधून श्री गुरुजी पुरस्कार देण्याचा हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आहे. तसेच या पुरस्कृत प्राप्त व्यक्तींना भेटणे, त्यांचे विचार ऐकणे हा एक दर्जेदार अनुभव आहे. – भैय्या जोशी, माजी सहकार्यवाह

प्रमुख अतिथी प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या भाषणातून निस्वार्थ सेवा, शिस्त व राष्ट्रभक्ती या तीन प्रमुख गोष्टींमुळे रा.स्व.संघ जनकल्याण समिती ओळखली जात असल्याचे आवर्जून नमूद केले. सद्गुरूंचेही हेच म्हणणे होते. राष्ट्र महासत्ता व्हावे असे सद्गुरुंना वाटायचे त्यासाठीच जीवन विद्या मिशन संस्थेची स्थापना करण्यात आली. तसेच आज जे पुरस्कार सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्यांचा यथोचित्य सन्मान करण्याची रा.स्व.संघ जनकल्याण समितीची पद्धत फार उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले. भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. रा.स्वं.संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत, अध्यक्ष डॉ. रविंद्र साताळकर यांनी प्रास्ताविक केले. अलिबागच्या शीतल कुंटे हीने पसायदान सादर केले.

Exit mobile version