| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला गेल्या दीड महिन्यांपासून स्वच्छतेच्या कामामुळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे देश-विदेशातून किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांना किल्ला सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर जंजिरा किल्ला बुधवारी (दि.14) पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
सुमारे 22 एकर क्षेत्रावर पसरलेला आणि सुमारे 40 फूट उंच तटबंदीने वेढलेला जंजिरा किल्ला हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून हा किल्ला बंद ठेवण्यात येतो. या कालावधीत किल्ल्याच्या आतील परिसरात तसेच तटबंदीच्या आजूबाजूला पाच ते सहा फूट उंच गवत आणि झाडेझुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुरातत्त्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे बंद ठेवून चारही बाजूंना कामगार लावून स्वच्छतेचे काम सुरू केले. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून हे काम सुरू असल्याने किल्ला पर्यटकांसाठी खुला होण्यास विलंब होत होता. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकत्यांनी पर्यटकांची होणारी गैरसोय पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे दीड महिन्यांपासून किल्ला सुरू होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या पर्यटकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जंजिरा किल्ला बुधवारपासून पर्यटकांसाठी खुला
