पर्यटकांची व स्थानिकांची प्रतिक्षा संपली
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दरवाजे बंद करण्यात आले होते. आज पुरातत्व विभागाने पाच महिन्यांनी ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्या शुभ हस्ते उघडण्यात आले. यामुळे पर्यटकांची व स्थानिक व्यवसायिकांची प्रतिक्षा आता संपली.

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरुन पर्यटकांची ने आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातुन दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून, जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून, व्यवसायकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी शिडाच्या बोट चालक मालक यांनी जंजिरा किल्ला चे दरवाजे उघडल्याने समाधान व्यक्त केले.
आम्ही किल्ला पाहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आलो होतो. परंतु, किल्ला बंद असल्याने काल किल्ला पाहता आला नाही, आज पुरातत्व विभागाने किल्ला पाहण्यासाठी आम्हाला परवानगी दिल्याने आम्ही सर्व समाधानी आहोत.
आकाश होळकर
बारामती पुणे
पावसाळ्या मध्ये किल्ल्याच्या अवती- भवती पाच ते सहा फुट उंचीची झाडे -झुडपे गवत वाढल्याने झुडपात सरपटणारे जनावरे असू शकतात. यापासून कोणाला धोका होऊ नये त्या करिता पुरातत्व विभागाने किल्लाचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले नव्हते. आता संपूर्ण किल्लाची साफ सफाई झाली असून, आज पासून पर्यटकांनसाठी किल्ला खुला करण्यात आला आहे. किल्ला पाहण्यासाठी 15 वर्षाच्या आतील मुला- मुलींना शुल्क माफ असून, 16 वर्षावरील एका व्यक्तीचे 25 रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन क्यु आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रकाश घुगरे
पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी





