। माणगाव । प्रतिनिधी।
माणगाव तालुक्यातील उंबर्डी गावच्या हद्दीत काळ नदीत शनिवारी (दि.4) सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात 11 वर्षीय मुलगी वाहून जाऊन तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे साडे चार वाजण्याच्या सुमारास आश्विनी गेनु ढेबे (11), रा. गडले दुधवान, ता. मुळशी, जि. पुणे ही आपल्या आजी सोबत गुरे आणण्यासाठी शेतात गेली होती. ती गुरे घेऊन परतत येत असताना मौजे उंबर्डी येथील काळ नदीचे पात्र ओलांडत होती. त्याचवेळी परिसरात अचानक पावसाचा जोर वाढला आणि नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने आश्विनीचा तोल जाऊन ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
ग्रामस्थांनी तात्काळ तिचा शोध घेतल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती दगडू कोकरे (30), रा. उंबर्डी यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शना खाली पो.स.ई जाधव हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेने उंबर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







