। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे |
जेट्टीच्या पुढील कामासाठी लागणारे प्लिथं कॅप आगरदांडा परिसरात बनवण्याचे काम सुरु आहे. ते पूर्ण होताच जंजिरा किल्ल्याची प्रवाशी जेट्टी एप्रिल महिन्यात पूर्ण होईल. मे महिन्यात पर्यटकांसाठी खुली करण्याचा मानस होता. परंतु, समुद्रात काम करताना भरती-ओहोटी वेळेत काम करावे लागते म्हणून च काम पूर्ण मे महिन्यात होईल. मे महिन्यात समुद्र खवळलेला असल्याने जेट्टीचा वापर होणार नाही. पुढील हंगाम म्हणजे दिवाळीत पर्यटक नवीन जेट्टीने किल्यात जातील.
150 मीटर ब्रेकवॉटर वॉलमुळे समुद्राच्या लाटा अडवल्या जातील आणि प्रवाशी जेट्टी पूर्णपणे सुरक्षित असेल. पर्यटकांना सहज जेटीवर उतरून किल्ला निवांत पाहता येईल. सुरक्षित व आनंददायी प्रवास होईल अशी अशा आहे. मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी माहिती दिली.
मुरुड हे पर्यटन क्षेत्र असल्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रतिवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरुन किल्ला पाहण्यासाठी येत असतात. जंजिरा किल्ल्यात मार्चनंतर समुद्राच्या पाण्याला वेग येतो, बोटी हलायला लागतात. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर उडवावे लागते आणि ते भीतीदायक असल्याने शासनाने जंजिरा किल्ल्यात नूतन प्रवाशी जेटी बनवण्याचे ठरवले. 93 कोटी मंजूर झाले, 2023 ला काम सुरु झाले. ही जेट्टी किल्ल्याच्या मागल्याबाजूस असल्याने लाटांचा जोर असतो म्हणून लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेकवॉटर बांधण्यात आला. मे 2024 ला ब्रेकवॉटर पूर्ण झाला. परंतु जानेवारी 2025 उजाडला तरी जेट्टीचे पुढील काम सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
किल्ल्याच्या मागीलबाजूस हि जेट्टी असल्याने राजपुरीच्या शिडाच्या बोटधारक नाराज आहेत. कारण त्यांना शिडाची बोट किल्ल्याला वळसा मारून जेट्टीवर न्यावी लागणार असल्याने त्यांचे वेळ व कष्ट वाढणार आहेत. मुख्य समुद्रातून जावे लागणार असल्याने पर्यटकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने बोलले जाते. म्हणून बोटधारक नूतन जेटी बाबत नाराज आहेत.जंजिरा आणि पद्मदुर्ग (कासा ) हे दोन्ही किल्ले पुरातत्व खात्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ठेवा आहे. जेट्टी नसल्यामुळे होडीसोबत छोटी होडीदेखील न्यावी लागते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरीटाईम बोर्डाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात.जेट्टी लवकर झाल्यास बोटधारकांचा त्रास कमी होईल
ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी 4 ते 5 लाख पर्यटक देश विदेशातून भेट देतात.पद्मदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक दृष्ट्या अधिक महत्त्व असले तरी फ्लोटिंग जेट्टी व्यवस्था उपलब्ध नसल्याने तुलनेने खुप कमी संख्येने भेट देतात अशी स्थानिकांसह पर्यटकांची धारणा आहे.