जंजिरा जलदुर्ग उद्यापासून कुलूपबंद

मेरिटाइम बोर्ड, पुरातत्व विभागाचे निर्देश
। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।
पावसाळा जवळ आल्याने मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग येत्या 26 मे, 2022 पासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अलिबाग, मुरूड चे अधिकारी बजरंग येलीकर, यांनी मंगळवारी बोलताना दिली. उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. प्रति वर्षी 5 लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येतात. 22 एकरवर उभा असणारा जंजिर्‍यावर 19 बुरुज आहेत.पूर्वी 514 तोफा होत्या. त्यातील मोजक्याच दिसून येतात. इतिहासात जंजिरा हा अजिंक्य किल्ला अशी नोंद असल्याने जंजिरा पाहण्याचे पर्यटकांतून मोठे आकर्षण दिसून येत आहे.दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढती आहे. जंजिरा पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांमुळे येथील बोट चालक, लॉन्च मालक, यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. त्यामुळे जंजिरा खुला असणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे. जंजिरा सुरू असेल तरच पर्यटक राजपुरी जेटीवर येतात.

पावसाळा सुरू जवळ आला की, समुद्रातील वातावरण बदलत जाते. मोठया उसळणार्‍या लाटा किल्ल्याच्या तटबंदीवर धडकत असतात.अशावेळी पर्यटकांची सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. अशा वेळी किल्याकडे जाताना एखादी दुर्घटना घडल्यास ही जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न निर्माण होतो.त्या पेक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरातत्व विभाग कडून जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना आतून पाहण्यासाठी कुलूपबंद करण्यात येतो, अशी माहिती येलीकर, यांनी दिली.

पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणार्‍या लाटा, वादळ,हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपूरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवत असतात. यातून -कुणाचाही आनंद हिरावून घेण्याचा अथवा कुणाचेही नुकसान करण्याचा हेतू नाही. – बजरंग येलीकर, पुरातत्व अधिकारी

पावसाळ्यात जंजिरा सुरू ठेवा
अलीकडे पावसाळ्यात पर्यटन करण्याचा रोख वाढला आहे.कोकणातील समुद्र किनार्‍यावर पाऊस भरपूर पडतो. अशा वेळी पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा कमी झालेल्या असतात. हिरव्यागार वनश्रीने परिसर नटलेला असतो. मुरूड कडे येणारे पर्यटक खास करून जंजिरा पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे पावसाळ्यात जंजिरा दर्शन सुरू ठेवावे असे मत पर्यटकांनी व्यक्त केले.पावसाळ्यात जंजिर्‍यावर धडकणार्‍या लाटा रौद्र आणि रोमांचकारी असतात. जंजिरा जणू हिरवागार शालू पांघरून लपटलेला असतो. हा नजरा जवळून पाहण्याची पर्यटकांची मनोमन इच्छा असते. गर्दी, गोंधळ, उन्हाळा नसल्याने लॉजिग व अन्य खर्च कमी झालेला असतो. पावसाळ्यात काळजीपूर्वक नियोजन करून जंजिरा सुरु ठेवल्यास आम्हाला देखील जवळून जंजिरा पाहता येईल असे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version