मुरूड-अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांची माहिती
। मुरूड । प्रकाश सद्रे ।
पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला मुरूडचा प्रसिध्द जंजिरा जलदुर्ग एकूण परिस्थिती पाहून 25 सप्टेंबरपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुरूड-अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी बुधवारी बोलताना दिली. पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक जंजिरा खुला होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. कारण अनेकांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
पावसाळ्यात जंजिरा जलदुर्गात ठिकठिकाणी उंच गवत, झाडे झुडपे, वेली मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. यामध्ये विषारी सापांचा, अन्य सरपटणार्या प्राण्यांचा संचार असल्याने ही वाढलेली झाडी काढून जलदुर्गात स्वच्छता प्रथम करावी लागणार आहे. शिवाय खवळलेल्या समुद्रातील लाटांच्या पाण्याचा वेग पाहणेदेखील महत्वाचे आहे. सर्व अंदाज घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आतून स्वच्छता अत्यन्त महत्वाची जवाबदारी असून याला आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत. सध्या पाऊस पडत असल्याने जंजिर्याची अंतर्गत स्वच्छता करण्यासाठी अडथळे येत आहेत. स्वच्छता आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास जंजिरा जलदुर्ग 25 सप्टेंबरच्या आधी देखील खुला केला जाऊ शकतो, अशी माहिती बजरंग येलीकर यांनी दिली.
1 सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा प्रवाशी जलवाहतूक सेवा सुरू झाली असल्याने पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. रो-रो सेवा सुरू झाली आहे. मुंबई ते मांडवा (अलिबाग) जलमार्ग खुला झाल्याने मुंबईकडून मुरुडकडे चारचाकी वाहने घेऊन जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. अलिबाग ते मुरूड मार्ग चांगला झाल्याने पर्यटक वाहनाने सुखद प्रवास करीत मुरूडमध्ये पोहोचत आहेत. काशीद बीचवर येणारे पर्यटक जंजीरा पाहण्यासाठी मुरुडकडे हमखास येतात असे दिसून येते. त्यामुळे पर्यटन व्यवसायात तेजी येत असते. मुरूडचा घरगुती गणेशोत्सवदेखील प्रसिध्द आहे. त्यामुळे चाकरमानी, पर्यटक मोठ्या संख्येने येणार यात शंकाच नाही. त्यामुळे आता पावसाळ्यात बंद असणारा जंजिरा जलदुर्ग खुला होण्याची प्रतीक्षा सर्वाना लागून राहिली आहे. यंदा पासून मुरूड समुद्रकिनार्याचे प्रशस्त मनमोहक सुशोभीकरण हा महत्वाचा पर्यटन बिंदू पर्यटकांना निश्चित खिळवून ठेवू शकेल यात शंका नाही. पुरातत्व विभागाने जंजिर्याची स्वछता युद्धपातळीवर करून जंजिरा पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी सर्व थरातून केली जात आहे.
पावसाळ्यात बंद असणारा मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुरूड बीचवर पावसाळ्यात बंदी नसते. मुरूड बिचचे सुशोभीकरण अगदी अंतिम टप्प्यात असून पर्यटकांना मुरूड बीचवर किनारा हॉटेल ते विश्रामधाम, पुढे ग्रामीण रुग्णालय ते सार्वजनिक बांधकाम कार्यालया पाठीमागे समुद्रकिनारी निवांत बसण्याची सुविधा आणि प्रशस्त सुशोभीकरण अंतर्गत मनाला भावणारे मनमोहक, सुंदर, रूप पाहायला पर्यटकांना आणि नागरिकांना मिळणार आहे. सुशोभीकरण अंतर्गत भव्य पार्किंगची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे.