जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

| मुंबई | प्रतिनिधी |

मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. शनिवारी (दि.16) अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत राज्यभरातून मराठा समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, “29 मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, सातारा, हैदराबाद आणि इतर संस्थानांचे गॅजेट अध्यादेश लागू करावेत, राज्यातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्यासाठी अध्यादेश काढावा. सरकारकडे 29 मेपर्यंतची मुदत आहे. याची अंमलबजावणी झाली नाही तर 30 मे रोजी उपोषण आणि मोठे आंदोलन करण्यात येईल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “मुंबईत समाज एकवटला होता, त्या वेळी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मग आता आमची प्रमाणपत्रे का रोखली जात आहेत? हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातील मराठा बांधवांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे आणि मराठा समाजाचे मन जिंकावे.” तसेच, “ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र द्यावे, ग्रामपंचायतीमध्ये नोंदी लिहाव्यात, सातारा संस्थानचा अध्यादेश लागू करावा आणि 1994 च्या धर्तीवर आरक्षणाचा अध्यादेश काढावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

Exit mobile version