जरांगेंविरोधात भुजबळांचे उलट तंत्र !

‘जरांगेंना देवही अडवू शकत नाही, मग सरकार काय?’
| मुंबई | वृत्तसंस्था |
मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी न करत बसता थेट मराठा आरक्षणाचा जीआर काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जालन्याला जाण्याऐवजी अंतरवाली सराटी येथेच दोन-चार मंत्र्यांचे कायमस्वरुपी बंगले आणि मुख्य सचिवांचे एक कार्यालयही सुरु करावे. जेणेकरुन मनोज जरांगे यांच्या डोक्यातून एखादी अभिनव कल्पना निघाली की, मुख्य सचिव लगेच सही करुन तसा जीआर काढू शकतील, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या संपूर्ण पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी उपरोधिक शैलीचा प्रभावीपणे वापर करत मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. पत्रकार परिषदेत संपूर्ण वेळ भुजबळ यांनी, ‘आपण जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत’, ‘जरांगेंनी सरकारला नव्हे तर सरकारनेच जरांगेंना वेठीस धरलंय’, ‘आता पुढच्या मेळाव्यात मीदेखील जरांगेंच्याच बाजूने भाषण करणार आहे’, अशा एकापेक्षा एक उपरोधिक वक्तव्यांचा सपाटा लावला होता.

आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सरकारचेच मंत्री आणि अधिकारी आमच्याशी बातचीत करण्यास आले होते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने जे काही लिहून घेतले आहे त्याचीच पूर्तता करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यामुळे सरकारने आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाज पेटला आहे. मराठा युवक सध्या काहीही काम करत नाही त्याच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्याला आरक्षणाची गरज आहे. आता सर्व पक्षातील मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत. या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा येणाऱ्या काळात मते मागण्यासाठी आपण आमच्या दारात येणार आहात, याचा विचार करावा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

देव आडवा आला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार : जरांगे पाटील
जरांगे पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला आरक्षण मिळणे अवघड नाही. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या आढळल्या आहेत.मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाणार शंभर टक्के जाणार देव जरी आडवा आला तरी तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मर्यादेचा विषय आहे तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायच्या असतील तर अगोदर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि त्यानंतर आपल्याला जेवढी आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे तेवढी वाढवावी, असे त्यांनी म्हटले.

Exit mobile version