। पुणे । वृत्तसंस्था ।
मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ते पुणे सत्र न्यायालयात आज हजर झाले असता पुणे कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द करून जरांगेंना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशी समजदेखील दिली आहे.
जरांगे यांच्यावर 10 वर्षांपूर्वीच्या एका नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु, जरांगेंनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे कोर्टासमोर हजर होण्यास असमर्थता दर्शवली होती. उपोषण आणि प्रकृतीची खराब स्थिती-मनोज जरांगे उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात किडनीच्या इन्फेक्शनमुळे ते दाखल झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना 2 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते कोर्टासमोर हजर होऊ शकले नव्हते. मात्र, डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिल्यामुळे ते आज अॅम्ब्युलन्समधून कोर्टासमोर आले. कोर्टासमोर त्यांनी आपली प्रकृतीची माहिती देत अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या अहवालावर आधारित कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले.
मात्र, कोर्टाने जरांगेंना नव्याने बंद पत्र देण्याचे निर्देश दिले असून न्यायालयाने जरांगेंना कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशी समजदेखील दिली आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे.