| उरण | वार्ताहर |
सिडको प्रशासन व जासई प्रकल्पग्रस्त यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. सिडकोने पुन्हा एकदा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. येत्या दि. 20 ऑक्टोबर रोजी प्रकल्पग्रस्त व सिडको प्रशासन यांची बैठक पुन्हा एकदा होणार आहे.
जासईमधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने साडेबारा टक्के भूखंड देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याच्या निषेधार्थ रेल्वे मार्गाचे काम बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी एक महिन्याची मुदत देत दिली होती. याची दखल घेत सिडकोने घेत कार्यालयात सोमवारी बैठक झाली.
यावेळी सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी भूखंडाचे इरादापत्र लवकरच देऊ, असे सांगितले. यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्हाला न्याय मिळाला नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत यांनी दिला आहे. या बैठकीस रमाकांत म्हात्रे, हरिभाऊ म्हात्रे, महादेव पाटील, हरी म्हात्रे आदी उपस्थित होते.