जासई, वहाळ परिसरात; बेकायदेशीर डेब्रिजचे डोंगर

उरण । वार्ताहर ।
उरण-पनवेल हद्दीमध्ये मुबंईतील डेब्रिजचा हजारो टन कचरा बेकायदेशीरपणे टाकून डोंगर उभे केले आहेत. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाकडे तक्रार करूनही ते कारवाई करतो असे सांगून वेळ मारून नेत आहेत.
मुंबईमधून दररोज निघणारा हजारो टन डेब्रिज जासई, वहाळ व गव्हाण ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत आहे. या डेब्रिजमध्ये गटारातील घाण, मृत पशुपक्षी, प्राण्यांच्या अवयव यांचा समावेश असतो. या अवयवांची दुर्गंधी हवेत मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने प्रदुषणात भर पडत आहे. या परिसरात वाढते वायु प्रदुषण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.
मुंबईत डेब्रिज टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रोज निघणारा हजारो टन कचरा डेब्रिज या परिसरात टाकला जात आहे. काही खाड्याही डेब्रिजचा भराव करून बुजविण्यात आल्या आहेत. बामणडोंगरी खाडीत तर चक्क खारफुटींवर हा कचरा टाकून कांदळवन नष्ट केले आहे. खाड्यामध्ये डेब्रिज टाकल्याने समुद्रातील खारे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम मासळीवर होऊन ती मृत अथवा गायब झाली आहे. त्यामुळे गरीब मच्छिमार बांधवांवर उपासमारीचे संकट आले आहे.
तक्रारी करूनही कारवाई नाही
येथील ग्रामपंचायतींनी संबंधित सिडको, पोलिस आणि शासकीय यंत्रणेकडे तक्रारी अनेकवेळा केल्या आहेत. मात्र त्यावर आजतागायत कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. तसेच याबाबत ग्रामपंचायतकडूनही ठोस असा पाठपुरावा होत नसल्याचे दिसत आहे. डेब्रिजच्या भरावामुळे भविष्यात येथील जनतेला मोठ्या समस्यांचा सामना करण्याची वेळ येणार आहे.

Exit mobile version