| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने आढावा बैठक बोलवण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात अलिबाग तालुक्यातील जल जीवन मिशनच्या आढाव्या बैठकीने झाली. आमदार जयंत पाटील यांच्या मागणीमुळे प्रशासन आणि स्थानिक आमदारांना जनतेच्या पाणी प्रश्नी अखेर रस्त्यावर उतरावे लागले आहे.
आ. जयंत पाटील यांनी या प्रश्नाला वाचा फोडली नसती, तर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा झाला असता. कागदावर निधी खर्च होऊन नागरिकांना मात्र पुन्हा पाण्यासाठी भटकावे लागले असते. प्रशासनाला आता प्रत्येक कामांची योग्य तपासणी करावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात 809 ग्रामपंचायतीमधील 1881 गावापैकी 1422 गावांमध्ये तब्बल एक हजार 200 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी आज अखेर 108 योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यासाठी तब्बल 193 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही कामे एकाच ठेकेदारांकडे देण्यात आल्याने तो ठराविक वेळेत पूर्ण कशी करणार तसेच त्याचा दर्जा काय राहणार. त्यामुळे नागरिक पाण्यावाचून तडफडत ठेवायचे का असा सवाल आमदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केला होता. आमदार पाटील यांनी जनतेच्या प्रश्नावर थेट हात घातल्याने अन्य आमदारांनी देखील त्यांच्या मागणीला सहमती दर्शवली होती.
तालुकानिहाय जलजीवन मिशन योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना दिले होते. त्यानुसार डॉ. बास्टेवाड यांनी गुरुवारी बैठक बोलवली होती.
आ. जयंत पाटील यांनी वाचा फोडल्याने अखेर स्थानिक आमदारांनाही या बैठकीला हजर राहावे लागले. म्हणजेच प्रशासन आणि स्थानिक आमदारांना जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यावे लागल्याचे दिसून आले.
आ. जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार डॉ. बास्टेवाड यांनी तालुक्यातील प्रत्येक कामांचा आढावा घेतला. किती कामे सुरु आहेत, किती कामे अपूर्ण आहेत, निधी योग्य पध्दतीने खर्च झाला का अशी माहिती घेतली. या बैठकीला सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदाराला देखील बोलवण्यात आले होते, अशी माहिती डॉ. बास्टेवाड यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या निर्देशानुसार जलजीवन योजनांचा आढावा घेण्याची बैठक बोलवण्याचे अधिकार मला दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी पहिली बैठक अलिबाग तालुक्याची बोलवण्यात आली होती. त्यामध्ये सर्व अधिकारी, अभियंते, स्थानिक लोकप्रतिनीधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वांचे म्हणणे, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कामाचा दर्जा, निर्धारीत वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
कशी आहे योजनेची परिस्थिती
गावे-1422
निधी- 1200 कोटी
कामे पूर्ण-108
खर्च-193 कोटी
मुदत संपलेली
260 कामे सुरु
9 कामे सुरु होऊन बंद
15 कामे सुरु झाली नाहीत
एकूण-284
मुदत असलेली
937 कामे सुरु
22 कामे सुरु होऊन बंद
72 कामे सुरु झाली नाहीत