खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शनिवारी खोपोलीमध्ये दौरा केला. यावेळी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांशी संवाद साधत उमेदवारांच्या तयारीचा सखोल आढावा घेतला. जयंत पाटील यांच्या आगमनाने खोपोलीत निवडणूकीच्या काळात संघटन बळकटीसाठी हा दौरा महत्वपुर्ण ठरणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या या बैठकीला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ठिकठिकाणी जयंत पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाने जनसंपर्क आणि संघटन बांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचेे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खोपोली शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात संघटन बळकटीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी खोपोली शहर परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने लढणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील, तसेच अरुण पुरी, विनिता कांबळे (औटी), निजामुद्दीन जळगावकर, रवी रोकडे, संतोष मालकर, शिल्पा मालकर, तस्लिमा नासिर पाटील आणि गणेश सूतक यांची जयंत पाटील यांनी व्यक्तिगत भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. प्रचाराची दिशा, स्थानिक प्रश्नांची समज आणि जनसंपर्काची गती याबाबत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान विविध प्रभागांतील स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि सध्या सुरू असलेल्या निवडणूक कामगिरीचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. तसेच, प्रत्येक उमेदवाराने नागरिकांशी थेट संपर्क वाढवावा, स्थानिक समस्यांची अचूक नोंद ठेवून नियोजनबद्ध उपाययोजना जाहीर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. खोपोलीच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, वाहतूक, अपघातमुक्त रस्ते, स्वच्छता आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची गरज, यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भर दिला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते बंधू पाटील, तसेच विविध प्रभागांतील समर्थक, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
