आमदार जयंतभाई पाटील यांनी रायगडच्या विकासासाठी सामाजिक दृष्टिकोन ठेवून, नियोजनबद्ध विकास, उद्योगधंद्यांचा विस्तार, सहकार, शिक्षण आणि राजकारण याविषयी अत्यंत पारदर्शक भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी माझा फार जवळचा संबंध आहे. जयंतभाईंना लहानपणापासून वडील स्वर्गीय प्रभाकर (भाऊ) पाटील यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले आहेत. लहानपणीच ते राजकीय तालमीत तयार झाले आहेत. आजोबा नारायण नागू पाटील आणि वडील प्रभाकर पाटील हे खऱ्या अर्थाने जयंतभाईंचे राजकारणातील गुरु आहेत.
माझे काका काळुशेठ खारपाटील हे उरणचे शेकापचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे भाऊंबरोबर त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. काका अलिबागला राजकीय कामासाठी, भाऊंना भेटायला गेले की सुलभाकाकू, काकांना जेवल्याशिवाय सोडत नव्हत्या. भाऊंच्या घरी त्याकाळी दिवसभर माणसांचा राबता असायचा. भाऊंना भेटायला येणारी मंडळी जेवल्याशिवाय जात नव्हती. माझे काका नेहमीच आमच्या घरात सुलभाकाकूंच्या माणुसकीचे कौतुक करत असत. लहानपणापासूनच वडील प्रभाकर पाटील जयंतभाईंना जिल्ह्यात कुठेही कार्यक्रम असला तरी सोबत घेऊन जात असत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून राजकारणातले बारकावे समजू लागले. काका काळुशेठ खारपाटील हे नेहमीच जयंतभाईंच्या हुशारीचे कौतुक करीत असत. विरोधी पक्षातील नेतेमंडळीसुद्धा भाईंच्या राजकीय व सामाजिक कार्याचे कौतुक करतात. अत्यंत प्रभावी विचारसरणी असलेल्या भाईंनी अल्पावधीतच आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर राजकारणातील फार मोठे टप्पे पार केले आहेत.
1997 साली आमदार जयंतभाईंनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची धुरा सांभाळली. सहकारातील सर्व पुरस्कार प्राप्त करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक ठरली आहे. आमदार तथा चेअरमन जयंतभाई यांनी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण कामाची ही पोचपावती आहे. भाईंच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या सहधर्मचारिणी सुप्रियाताई पाटील यांचा मोठा वाटा आहे. भाईंनी शेकापचे आमदार म्हणून, जिल्ह्यातील अनेक प्रश्न विधानपरिषदेत मांडून आवाज उठविला. रोखठोक व बेधडक स्वभावाचे भाई जेवढे आक्रमक आहेत, त्यापेक्षा अधिक ते संयमी पण आहेत. भाई जिथे संयम पाळायचा आहे, तिथे ते संयम पाळतात आणि जिथे आक्रमक व्हायची वेळ आली, तर ते आक्रमक होतात. हे गुण त्यांच्या अंगी आहेत. त्यांचे वक्तृत्वकौशल्य अफाट आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची व प्रगल्भ विचारांची जाणीव त्यांच्या भाषणातून नेहमीच होते. पक्षीय राजकारण न करता अडचणीच्या काळात मदत करणे, हा भाईंमधील महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळेच आज राज्यभरात ग्रामीण आणि शहरी भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
एखादी मोठी सभा असेल तर भाईंची तोफ डागणार म्हणून त्यांचे भाषण ऐकायला त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होते. भाईंची भेट झाल्यावर ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात. नवीन संकल्पाबाबत सल्लाही देतात. एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी राजकीय पटलावरील नेते म्हणून ते विविध क्षेत्रातून आपली वाटचाल करीत आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा बडेजाव नाही. कामावरील निष्ठा, मेहनत, आत्मविश्वास या आधारे त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आपल्या कार्यात तत्पर असणाऱ्या आमदार जयंतभाई पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
– पी.पी. खारपाटील






