| पालघर | प्रतिनिधी |
भाईंदर पूर्वेला सुशांत पाल (51) या व्यक्तीची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.19) उघडकीस आली आहे. नवघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोनल पार्क बिल्डिंग क्रमांक एकच्या तळमजल्यावर ज्वेलरीचे दुकान असलेले दुकानदार सुशांत पाल हे मयत अवस्थेत मिळून आले. त्यांच्या डोक्यावर खोलवर जखमा झालेल्या होत्या. मंगळवारी रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत ते राहत असलेल्या दुकानात जोरजोरात आवाज येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या जड वस्तूने मारल्याने डोक्यात अनेक जखमा झालेल्या आहेत. या घटनेची पोलिसांना बुधवारी दुपारी माहिती मिळाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे. तसेच फॉरेन्सिक व्हॅनद्वारे तपास सुरू केला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन ही हत्या का केली, कोणी केली व कशासाठी केली याचा तपास सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांनी सांगितले आहे.







