दागिने चोरणार्‍यासह खरेदी करणारा अटकेत

चोरांवर 18 गुन्हे दाखल, 1 लाख 29 हजारांचे सोने ताब्यात

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळमधील पियुश अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रकार घडला होता. सदर चोरीमध्ये चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला होता. नेरळ पोलिसांच्या उत्तम तपासात या चोरीच्या प्रकरणातील चोरट्यासह चोरीचे दागिने खरेदी करणार्‍याच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.

या चोरीमधील 1 लाख 29 हजार रूपये किमतीचे दागिने चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरट्यावर इतर पोलीस ठाण्यात आतपर्यंत एकूण 18 गुन्ह्यांची नोंद तर चोरीचे दागिने विकत घेणार्‍यावर इतर पोलीस ठाण्यात चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 गुन्ह्यांची नोंद आहे.
नेरळ मधील पियुष अपार्टमेंट येथील राहाणार शिक्षक संतोष कोळी यांच्या 201 फ्लॅटचा दरवाजाचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटातील सोने, आणि रोख रक्कम अशी सुमारे 5 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नेरळ पोलिसांनी 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेज तपासले. केलेल्या अथक प्रयत्नामध्ये त्यांना यश आले त्यांनी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेखला अटक केली आहे.

त्याने गुन्ह्यातील काही मुद्देमाल रमेश सोनीला विक्री केले असल्याचे समजल्याने त्यालादेखील नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या चोरीमधील 1,29,700 रूपये किमतीचे 26.200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शफिक उर्फ टीपी अब्दुल शेखविरूध्द ठाणे रबाळे पोलीस ठाण्यात 13, मनीदमन पोलीस ठाणे 2, एपीएमसी पोलीस ठाणे 1, कासारवडवली पोलीस ठाणे 1, पालघर पोलीस ठाणे 1 असे एकूण 18 घरफोडी चोरीचे गुन्हे व चोरीचे दागिने खरेदी करणार रमेश सोनीवर कासारवडवली पोलीस ठाणे 2, पालघर पोलीस ठाणे 1, दिडोंशी पोलीस ठाणे 1, चितलसर पोलीस ठाणे, 1 व वसई पोलीस ठाणे 1 असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version