| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील दहिवली भागातील एका राहत्या घरातून रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. घराच्या मागील बाजूने घरात घुसून लोखंडी कपाटातील तिजोरीत ठेवलेले तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जत शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून डॉग स्कॉडची मदत घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कर्जत शहरातील दहिवली भागातील एकतानगर येथील हर्षद जाधव यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घरातील लोक झोपल्यानंतर ही चोरी केली. घरात असलेल्या लोखंडी आणि लाकडी कपाटातील तिजोरी फोडून त्यातील 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात मंगळसूत्र, कानातील झुमके, तसेच मोबाईल फोन आणि 70 हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. घरात चोरी झाल्याचे कळताच अंकुश जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कर्जत पोलिसांनी तात्काळ अलिबाग येथून जिल्हा पोलिसांच्या डॉग स्कॉडला पाचारण केलेे.
तीन लाखांचे दागिने लंपास
