झोरे कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी

सार्वजनिक मंडळाला राहते घर केले दान

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

या आधुनिक जगामध्ये एखादी वीट सुद्धा कोणी कोणाला फुकट देत नाही. मात्र सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील खताळ कुटुंबीयांच्या वारसांनी आपल्या पूर्वजांचे राहते घर येथील खेमजाई नवतरूण मित्र मंडळ खेमवाडी या मंडळाला दान करत अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. गावकऱ्यांना आता विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.

सुधागड तालुक्यातील खेमवाडी-ताडगाव या गावाला गेली अनेक वर्ष त्यांचे स्वतःचे असे समाजमंदिर नव्हते. जे होते ते गावाच्या मानाने खूप लहान होते. त्यामुळे गावात काही कार्यक्रम किवा लोकांना एकत्र येण्यासाठी कोणतीच हक्काची जागा नव्हती. गावाच्या आजूबाजूला सर्व बाहेरील लोकांनी जागा विकत घेऊन कुंपण टाकून फार्म हाऊस तयार केले आहेत. त्यात हक्काची मोठी जागा उपलब्ध नसल्याने गावच्या तरुण मुलांना नवरात्र उस्तव, गावची पूजा तसेच सार्वजनिक कार्यक्रम व बैठक घेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत असे. त्यामुळे खेमजाई नवतरून मित्र मंडळ खेमवाडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनावर घेऊन गावचे जेष्ठ भगवान धोंडू खताळ व त्यांच्या पत्नी साखरी खाताळ यांच्या निधनानंतर गावच्या मध्यभागी असणारे त्यांचे राहते घर हे समाजकार्यासाठी मंडळाला द्यावे, अशी विनंती त्यांच्या वारसांना केली.

त्यानंतर तात्काळ त्यांचे कायदेशीर असणारे वारस सुरेश झिमा झोरे, आकाश हरिश्चंद्र झोरे, अविनाश हरिश्चंद्र झोरे, अक्षय हरिश्चंद्र झोरे व आदित्य हरिश्चंद्र झोरे यांनी त्यांच्या मालकी हक्कातील घर हे कोणताही स्वार्थ न ठेवता मोठ्या मनाने खेमजाई नवतरुण मित्र मंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळास सामाजिक बांधिलकी जपून बक्षीसपत्राद्वारे दान केले आहे. त्यांनी केलेल्या या समाज उपयोगी योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी समाजासाठी दाखविलेली ही उद्दात भूमिका सर्व तरुण पिढीसाठी प्रेरणादायी अशीच आहे. त्यासाठी खेमजाई नवतरूण मित्र मंडळ व ग्रामस्थ खेमवाडी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आजकालच्या स्वार्थी जगात कोणी कोणाला काहीही फुकट देत नाही. परंतु, अशाप्रकारे आपल्या पूर्वजांचे स्वतःचे राहते घर हे समाजसेवेसाठी व सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्याहून सुंदर गोष्ट आपण आपल्या पूर्वजांना देऊच शकत नाही. समाजातील तरुणांनी खरच या गोष्टींचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.

– बाळासाहेब धायगुडे, खजिनदार, खेमजाई नवतरुण मित्र मंडळ

Exit mobile version