| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील साळाव येथील जिंदाल स्कूलच्या विद्यार्थिनींना यावर्षीचा रक्षाबंधन सण एक वेगळाच आणि संस्मरणीय अनुभव देऊन गेला. या विद्यार्थिनींना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राखी बांधण्याची आणि सण साजरा करण्याची संधी लाभली.
राष्ट्रपती महोदयांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक स्वागत करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कनक ओसवाल हिचा विशेष समावेश होता. राष्ट्रपती भवनाला भेट देणे हा अभिमानास्पद आणि स्मरणीय अनुभव मानला जातो. भारताच्या समृद्ध वारसा आणि लोकशाही मूल्यांचे हे प्रतीक असलेले हे ठिकाण राष्ट्रीय इतिहासाशी जोडणारे तसेच अप्रतिम वास्तुकलेचा आनंद देणारे आहे. अनेकांना येथे भेट देताना देशभक्तीची आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना होते. विशेष म्हणजे, कनक ही आपल्या जिल्ह्यातील पहिली जैन मुलगी असल्याची नोंद आहे, जिने राष्ट्रपती भवनात अशी संधी मिळवली आहे. अल्पवयात मिळालेल्या या यशामुळे तीचे हे पाऊल जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.







