सुशोभिकरणासाठी साडेतेरा कोटींचा निधी
। उरण । वार्ताहर ।
जेएनपीएने बंदर परिसरातील नैसर्गिक जलकुंभ, पाणवठे व तलावांतील गाळ काढून पुनरुज्जीवित करुन ते सुशोभित करण्याची योजना आखली आहे. जेएनपीए व प्रशासन भवन परिसरात कामानिमित्ताने दररोज येणार्या देशी-विदेशी प्रवासी, वाटसरू, नागरिकांसाठी हे ब्युटी स्पॉट आकर्षण ठरणार आहेत. सुमारे साडेतेरा कोटीच्या खर्चाच्या योजनेच्या कामाला जेएनपीएने सुरुवातही केली आहे. त्यामुळे हे पाचही ब्युटीस्पॉट मे 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे जेएनपीए परिसराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत अशी माहिती जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.
ग्रीन पोर्ट उपक्रमाच्या दृष्टीने सध्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात आल्यानंतर प्रशासन भवनाच्या खालच्या बाजूला तसेच जुने शेवा गावच्या पायथ्याशी असलेले, शिव मंदिराजवळ आणि सीसीपी प्लाझा शेजारी असलेल्या पाच नैसर्गिक जलकुंभ, पाणवठे, तलावांचे सुशोभीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी 13 कोटी 11 लाख 70 हजार 625 रुपये खर्च अपेक्षित आहे. निधीच्या तरतुदीनंतर जेएनपीएने या योजनेच्या कामाला सुरुवातही केली आहे.
या प्रकल्पामुळे जेएनपीए परिसर वनस्पती आणि जीवजंतूंच्या निरोगी वाढीसह एक चांगले ठिकाण बनणार आहे. तसेच जैवविविधता वाढीलाही हातभार लागणार आहे. तसेच येथील रहिवासी पर्यटकांसाठी एक चांगले पर्यावरणीय स्थळ उदयास येईल.
– उन्मेष वाघ, उपाध्यक्ष
प्रत्येक जलसाठ्याचे विश्लेषण
जेएनपीए परिसरातील प्रत्येक जलसाठ्याच्या पाणलोट क्षेत्राच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्यासाठी इकोलॉजिकल बेसही तयार करण्यात आले आहेत. साचलेल्या पाण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नैसर्गिक दगडांच्या कडा आणि गॅबियन्स पर्यावरणाची नैसर्गिकरित्या भरभराट होण्यास करते. तसेच सूक्ष्म जीव आणि जलजीवांना चांगल्याप्रकारे प्रजनन आणि मुसळ घालण्याची जागा प्रदान करतात. यामुळे काँक्रीट, आरसीसी, बायोडिग्रेडेबल नसलेल्या साहित्याचा कोणताही वापर या कामासाठी करण्यात येणार नसुन त्याऐवजी गॅबियन भिंती, धारण बंधारे , ग्रीन ब्रिज कॉयर मॅट्स कॉयर रोल, जीसीएल लाइनर आदी इको तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.







