जेएनपीटी पालकांचे गेट बंद आंदोलन

मागण्या मान्य करण्याचे प्रशासनातर्फे आश्वासन

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या आर.के.एफ.जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा या संस्थेच्या मनमानी व एकतर्फी कारभाराविरोधात लोकशाही व कायदेशीर मार्गाने वरिष्ठ पातळीवर व संबधित विभागांना पत्र व्यवहार करून देखिल विद्यार्थी व पालकांच्या समस्या सूटत नव्हत्या. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. शिक्षण संस्थेच्या निष्क्रीय व मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व शिक्षक, पालक, विदयार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालक संघर्ष समितीतर्फे मंगळवारी (दि.4) गेट बंद आंदोलन केले.

प्रशासकीय अधिकारी पूजा अंजनीकर यांचे त्वरीत निलंबन करावे. तीन वर्षापासून ज्या शाळेत इमारतीमध्ये जे वर्ग भरत होते तेच पूर्ववत करावे. इयत्ता 8 वी ते 10 वी मराठी माध्यमिक विदयार्थ्यांना शासनाकडून आलेला अनुदान शाळेने घ्यावा व पालकांच्या मुलांची फी पूर्णपणे माफ करावी. शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्ण वेतन मिळावे. अशा विविध मागण्यासाठी पालक संघर्ष समितीच्या माध्यमातून पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत व शिक्षक नेते नरसु पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सदर आंदोलनाची दखल घेत, प्रशासनाने त्वरित पालकांना तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक व प्रशासन यांच्यात बैठक झाली. बैठकीत माजी आ. मनोहर भोईर, दिनेश पाटील, नरसु पाटील, एल. बी. पाटील, महादेव घरत, रेखा घरत, रत्नदिप पाटील, तुषार घरत, किरीट पाटील, सुरेश पाटील, रवि घरत, रमाकांत म्हात्रे, रमाकांत गावंड, गिरीश पाटील, प्रमोद कांबळे, किरण घरत, अमर म्हात्रे, रेखा ठाकूर,योगेश तांडेल, विश्वास पाटील, अजय खाडे, लिलेश्वर ठाकूर, अविनाश म्हात्रे, रंजना म्हात्रे, प्रियदर्शनी म्हात्रे, पल्लवी जोशी, जागृती ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा झाली. पालकांच्या शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याने गेट बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. पालकांनी, शिक्षकांनी गेट बंद आंदोलनास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेल्या सर्व मान्यवरांचे व मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version