। उरण । दिनेश पवार ।
जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर उपजिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकितही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 26 फेब्रुवारीपासून जेएनपीटी समुद्र चॅनल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी जेएनपीटीचे मुख्य सचिव जयवंत ढवळे, जेएनपीटीचे पदाधिकारी मोरे, उरणख्े तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, माजी विश्वस्त भूषण पाटील व जेएनपीटी अधिकार्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. तसेच 2 मार्च रोजी जेएनपीटी येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जेएनपीटी समुद्र चॅनल बंद आंदोलन तूर्तास स्थगित केली असल्याची माहिती हनुमान कोळीवाड्याचे सरपंच परमानंद कोळी यांनी दिली.
यावेळी हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा अध्यक्ष सुरेश कोळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 मार्च रोजी जेएनपीटी येथे होणार्या बैठकीस जेएनपीटीचे चेअरमन, जिल्हाधिकारी, सिडकोचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उरण तहसिलदार, ग्रामस्थ कमिटी आदी उपस्थित राहणार आहेत. त्यातून सकारात्मक चर्चा न झाल्यास समुद्र चॅनल बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेरपुनर्वसनासाठी 17 हेक्टर जमीन मिळावी, या मागणीसाठी मागील 35 वर्षे संघर्ष सुरू आहे. या 35 वर्षांच्या संघर्षांनंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील 256 कुटुंबियांचे जुन्या फुंडे-जसखार गावातील जेएनपीटीच्या मालकीच्या 710 गुंठा जागेत फेरपुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासन व हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांचे एकमत झाले होते. मात्र 710 गुंठे क्षेत्रावरील विकासाच्या आराखड्यात अनेक त्रुटी निघाल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. आराखडा मंजुरीसाठी वारंवार टाऊन प्लॅनिंग, सिडको यांच्याकडे पाठवून शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. ग्रामस्थांच्या घरांच्या किंमतीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असुन 26 फेब्रुवारीपासून जेएनपीटी समुद्र चॅनल बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याची त्रमाहिती सरपंच परमानंद कोळी यांनी दिली.