जीएसटीचे सहआयुक्त बेपत्ता

कुटुंबियांची पोलिसात तक्रार
। मुंबई । वृत्तसंस्था ।
जीएसटीचे सहआयुक्त राजेसाहेब माने हे बुधवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंद केली आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर राजेसाहेब माने यांचा शोध पोलिस घेत आहेत. बुधवारी ते नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले मात्र तिथून घरी परतले नाहीत. त्यानंतर कुटुंबाने शोध घेतला आणि अखेर पोलिसात धाव घेतली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या कांदिवली इथं राहणारे राजेसाहेब माने (वय 55 वर्षे) हे जीएसटी विभागात सहआयुक्त पदी कार्यरत आहेत. बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करत अधिक तपास सुरु आहे.
राजेसाहेब हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी माझगाव येथील जीएसटी भवनमधील कार्यालयात हजर झाले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ना ते कार्यालयात परतले. ना घरी पोहचले. माने यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून माने हरवल्याची तक्रार दिली आहे.

Exit mobile version