जोकोविचने पटकावले चौथ्यांदा अमेरिकन ओपनचं जेतेपद

24 व्या ग्रँडस्लॅमला गवसणी!

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने यापूर्वी 2011, 2015 आणि 2018 मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. तब्बल 24 ग्रँडस्लॅम नावावर असणारा नोव्हाक जोकोविच हा जगातला एकमेव टेनिसपटू ठरला आहे. याआधी मार्गारेट कोर्ट यांनी 24 पदकं पटकावली होती. पण, त्यातली 13 पदकं ही त्यांना ‌‘ग्रँडस्लॅम’ म्हणून मान्यता मिळण्याआधी जिंकली होती.

या सामन्यात नोव्हाक जोकोविचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. पुढील सेटमध्ये डॅनिल मेदवेदेवने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण टायब्रेकरमध्ये जोकोविचने आपली ताकद दाखवली आणि हा सेटही 7-6 (5) ने जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. तर, तिसरा सेट 6-3 असा जिंकून तो अमेरिकन ओपनचा चॅम्पियन बनला.

तीन सेटमध्ये जोकोविचनं डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला. मात्र, या दोघांमध्ये झालेले तिन्ही सेट टेनिसप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. नोव्हाकनं त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगज्जेतेपदासाठी का दावेदार आहोत, याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोव्हाकनं 6-3 असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला. पण, मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरा सेट ठरली. दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवनं कडवी झुंज देत आपणही यूएस ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला. पण नोव्हाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोव्हाकनं आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. 7-6(5) असा हा सेट जिंकून जोकोविचनं आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकनं 6-3 असं सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं.

मी कधीच कल्पना केली नव्हती की कधीतरी मी अशा प्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या 24व्या ग्रँडस्लॅमविषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण, गेल्या दोन वर्षांत मला असं वाटू लागलं होतं की, मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल तर मी ती का घेऊ नये?

नोव्हाक जोकोविच
राफेल, सेरेनाला टाकले मागे
एकीकडे आपल्या कारकिर्दीतलं 24वं ग्रँडस्लॅम पटकावताना नोव्हाक जोकोविचनं मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आत्तापर्यंत जोकोविच व सेरेना विल्यम्स हे 23 ग्रँडस्लॅमसह बरोबरीत होते. जोकोविचने राफेल नदालचा 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला होता. जोकोविचला जुलैमध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्याने 2023 मध्ये चारपैकी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत.
जोकोविचची 24 ग्रँडस्लॅम
जोकोविचने त्याच्या कारकीर्दीत 4 अमेरिकन ओपन, 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन आणि 7 विम्बल्डन अशी मिळून एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत.
Exit mobile version