ट्रकच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुण्यात अपघाताचे सत्र चालूच आहे. त्यातच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. रस्ता ओलांडत असताना पती-पत्नीला एका भरधाव ट्रकने धडक दिली. यात पतीचा जागेवरच मृत्यू झाला असून पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे.

पेश्याने पत्रकार असलेले शरद वसंतराव गायकवाड (42) हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या पत्नीसह एका मंदिराकडून डिकॅथलोन मॉलकडे जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने दोघांना धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि, या धडकेने दोघे पती-पत्नी हवेत उडून खाली पडले. यात शरद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर शरद गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच, अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडीही पोलिसांनी सुरळीत केली.

Exit mobile version