। पनवेल । प्रतिनिधी ।
स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र काढले होते. तो दिवस पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. त्या दिनाचे औचित्य पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्यावतीने सोमवारी (दि. 6) नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. शुभदा नील, कांदळवन अधिकारी साईश्वरी पडवळ, प्रा. डॉ. भाग्यश्री भोईर, भागवत कथाकार ज्ञानेश्वर बर्वे महाराज, भक्ती बर्वे, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षिका मंगला गडमुळे आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी केले.
यावेळी डॉ. वैभव पाटील यांच्या आवाज कोकणचा या साप्ताहिकाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अनिल कुरघोडे, संजय कदम, दीपक घोसाळकर, निलेश म्हात्रे, मयूर तांबडे, सुधीर पाटील, सुनील कटेकर, आरती पाटील, भरत कुमार कांबळे, धनाजी घरत, जगदीश भोईर, रणीता ठाकूर, सुजाता होळकर या पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.