जागरूक नागरिक म्हणून पत्रकारांनी काम करावे: आंचल दलाल

अलिबाग प्रेस असोसिएशनचा वर्धापनदिन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांनी प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून काम केले पाहिजे, असे मत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनचा 17 वा वर्धापनदिन बुधवारी (दि.15) अलिबाग प्रेस असोसिएशनच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्यासह जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, पत्रकार, छायाचित्रकार व वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी संवाद साधताना सांगितले की, पत्रकारांनी सत्य माहितीच्या आधारे निष्पक्ष बातम्या द्यायच्या असतात. जबाबदारीचे भान ठेवून काम करायचे असते. अलिबाग प्रेसने नेहमीच सामाजिक भान ठेवून तटस्थ आणि प्रामाणिकपणे बातमीदार म्हणून काम केले आहे. रायगडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यावर इथल्या प्रसार माध्यमांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. पोलीस दलाचे विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी मदत केली. अनेक गोष्टींमध्ये मला व्यक्तिगत माहिती नसताना किंवा निर्णय घेताना, अलिबागमधील पत्रकारांनी चांगल्या सूचना केल्या. भविष्यात पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याची आवश्यकता वाटल्यास पत्रकारांनी सूचना कराव्यात. योग्य सूचनांचे स्वागत करू, असे देखील आंचल दलाल म्हणाल्या.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार म्हणाले की, वाचनाची सुरूवात वृत्तपत्रापासून होते.तरुण पिढीने वृत्तपत्र वाचली पाहिजेत. तुम्ही कोणती वृत्तपत्र वाचता यावरून तुमची वैचारिकता समजते, असे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोरे यांनी केले. अलिबाग असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र शिगवण यांनी स्वागत केले. तर, सचिव राजेश भोस्तेकर यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version