यंदाही खड्ड्यातूनच प्रवास

अलिबाग-रोहा मार्गावर चिखल, मातीचा भराव; प्रवाशांचा भ्रमनिरास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मोठा गाजावाजा करीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अलिबाग – रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षी सुरुवात झाली. यंदा पावसाळ्यात खड्ड्यातून जाण्याचा त्रास कमी होणार अशी अशा प्रवाशांना होती. मात्र या मार्गावरील प्रवाशांची मोठी भ्रमनिराशा झाली आहे. यावर्षीदेखील पावसाळ्यात खड्डे व चिखलातूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

अलिबाग – रोहा मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी शासनाकडून 150 कोटीहून अधिक रुपये मंजूर करण्यात आले. गेल्यावर्षी गुढीपाडव्याला 22 एप्रिलपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम सुरु केले. बेलकडेपासून वढावपर्यंत डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर वेलवली-खानाव ते उसर गेल कंपनीपर्यंत काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली.

एका बाजूचे काँक्रिटीकरण करण्यात आले. दुसर्‍या बाजूचे काँक्रिटीकरणाचे काम थांबविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे कठीण होऊन बसले. कंपनीच्या अवजड वाहनांना वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास त्याठिकाणी मातीचा भराव करण्यात आला. तसेच वावेपासून रुंदीकरणाच्या नावाखाली खडी, मातीचा भराव केला. परंतु पावसाळ्यात ही खडी बाहेर निघत आहे. मातीच्या भरावामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात यंदाही खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कूर्मगतीच्या कामामुळे यावर्षीदेखील चिखल मातीतूनच प्रवास करावा लागणार आहे. या चिखल, खडी, मातीमुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे.

वावे-बेलोशीतून प्रवास जीवघेणा
अलिबाग तालुक्यातील बेलोशी वावे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण होऊ बसले आहे. या रस्त्यासाठी लाखो रुपये मंजूर झाले आहे. मात्र या कामाला अद्यापर्यंत सुरुवात झाली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
रिक्षा चालकांनी जपली माणूसकी
बेलोशी-वावे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. दगड बाहेर आले आहेत. पावसाने सुरुवात केल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे वावे येथील रिक्षा चालक व मालकांनी माणुसकी दाखवत काही खड्डे श्रमदानातून बुजविण्याबरोबरच सखल भागात साचलेले पाणी काढले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामाला गती न मिळाल्याने उपअभियंता यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना लेखी पत्र दिले आहे. परंतु पावसाळ्यात नागरिकांसह प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

जे. ई. सुखदेवे,
कार्यकारी अभियंता, अलिबाग
Exit mobile version