पाचव्यांदा युवा महोत्सवाचे विजेतेपद
| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे द. ग. तटकरे महाविद्यालय, तळा येथे नुकतेच युवा महोत्सवाच्या रायगड (दक्षिण) जिल्हास्तरीय फेरीत एकूण 16 स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून जे.एस.एम. महाविद्यालयाने सलग पाचव्यांदा महोत्सवाचे विजेतेपद पटकावले आहे. अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, सुधागड या तालुक्यांतील 26 महाविद्यालयांतील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, मेहेंदी, मूर्तीकला, कोलाज, कार्टूनिंग, चित्रकला, रांगोळी अशा विविध प्रकारच्या 32 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
जे.एस.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण 23 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यापैकी वक्तृत्व (मराठी), कथाकथन (हिंदी), वादविवाद (इंग्रजी), समूहगीतगायन, वाद्यवादन, एकपात्री अभिनय (मराठी), स्कीट (मराठी), कोलाज, चित्रकला या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक, लोकनृत्य, कथाकथन (मराठी), रांगोळी या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक; तर वादविवाद (मराठी), एकपात्री अभिनय (हिंदी), नाट्यसंगीत या स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक आणि मेहेंदी स्पर्धेत उत्तेजनार्थ अशी एकूण 16 स्पर्धाप्रकारांमध्ये पारितोषिकांची लयलूट करत जे. एस. एम. महाविद्यालयाने सलग पाचव्यांदा युवा महोत्सवाच्या रायगड (दक्षिण) जिल्हास्तरीय विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. सोनाली पाटील, रायगड (दक्षिण) सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुंबई विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.