वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
| पेण | प्रतिनिधी |
धरमतर चेकपोस्टपासून जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या बाजूला मालवाहतूक करणारे मोठमोठे ट्रक उभे करण्यात येत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. चालकांना गाडी अन्य ठिकाणी लावण्यास सांगितल्यास त्यांच्याकडून अरेरावी करण्यात येते. ही बाब गंभीर असून, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली असून, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच समजत नाही. त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांची तारेवरची कसरत होते. वडखळ बायपासपासून धरमतर चेकपोस्टपर्यंत पेण-अलिबाग रस्त्याची चाळण झालेली आहे. सकाळच्या वेळेमध्ये पेण, पनवेल, उरण, खोपोलीकडून कित्येक जण अलिबागच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यांची आपल्या कार्यालयात पोहोचण्याची लगबग सुरू असते. दरम्यान, धरमतर चेकपोस्ट सोडल्यानंतर या प्रवाशांना एक वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. ते म्हणजे, धरमतर चेक पोस्टपासून जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत मालवाहतूक गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे दुसरी वाहने जाताना त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच कुणी या मालवाहतूक गाड्यांच्या वाहनचालकांना गाड्या दाबून लावायला सांगितल्यास, ते अरेरावीची भाषा करतात.
आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळाची खातरजमा केली असता, रस्त्याच्या एका बाजूने मालवाहतूक गाड्या उभ्या केलेल्या आढळल्या. त्यातील एम.एच.046-3485 वाहनाच्या चालकास विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी वाहतूक पोलिसांचा उल्लेख करून आमची तक्रार करा, असे सांगितले. यावरून दोन गोष्टी निश्चित, एकतर या वाहनांचे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. नाही तर दुसरी बाब म्हणजे, हे वाहनचालक वाहतूक पोलिसांनादेखील जुमानत नाहीत. तरी, वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठांनी याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कशी थांबवता येईल, याकडे आवर्जून लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. कारण, धरमतर चेकपोस्टच्या पुढे पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आहे. परंतु, मुद्दामहून वाहन चालक गाड्या रस्त्यावर लावतात. कंपनीची विनामूल्य पार्किंग, सोबत खासगी पे पार्किंगचीसुद्धा सुविधा आहे. परंतु, वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद असल्याने हे वाहनचालक बेजबाबदारपणे आपली वाहने मुख्य रस्त्यावर उभी करुन वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत.
या वाहतूक कोंडीबाबत जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी आत्माराम बेटकेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना संपर्क होऊ शकला नाही.