जेएसडब्ल्यूचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

पंप हाऊससाठी वीजवाहिनीच्या कामात त्रुटी
खासगी जागेतूनही वीजवाहिनी टाकल्याचा आरोप


। नागोठणे । वार्ताहर ।

डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या के.टी. बंधार्‍याजवळील पंप हाऊससाठी भूमिगत उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे काम सुरु आहे. वीजवितरण कंपनीच्या कानसई येथील उपकेंद्रातून ते पाटणसई ग्रा.पं. हद्दीतील चिकणी गावालगतच्या के.टी. बंधार्‍यापर्यंत ही वीजवाहिनी जेएसडब्ल्यू कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराकडून टाकण्यात येत आहे. मात्र या कामात अनेक त्रुटी राहत असल्याने भविष्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार आहे.

सध्या ही वीजवाहिनी टाकण्यासाठी महामार्गालगत खोदलेल्या खड्ड्यांमुळे सर्व माती रस्त्यावर येऊन अपघातांचा धोका निर्माण झाल्याने नागरिक व वाहन चालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंप हाऊससाठी उच्च अश्‍वशक्तीच्या मोटार बसविण्यात येणार असल्याने त्यासाठी पंप हाऊसमध्ये 22 के.व्ही. एवढी उच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्यात येत आहे. महावितरणच्या 1.3 डीडीएफ या योजने अंतर्गत हे काम होत आहे. अर्थात हे काम करताना ग्राहक कंपनीने महावितरणची सर्व कायदेशीर व आर्थिक प्रक्रिया पूर्ण करून नंतर त्यांची परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून महावितरणच्या सर्व अटी-शर्तींचे पालन करूनच काम पूर्ण करण्याची जबाबदारी ग्राहक कंपनीची असते.

अशाप्रकारे कंपनीने वीजवितरणच्या परवानगीने नियुक्त ठेकेदाराकडून हे काम काही दोन महिन्यांपूर्वी सुरु केले. केवळ राष्ट्रीय महामार्ग खात्याची परवानगी घेऊन हे खोदकाम महामार्गालगत सुरु आहे. काही ठिकाणी महामार्गालगतच्या मात्र संपादित न झालेल्या जागेतून शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता हे काम सुरु असल्याचा आरोप काही शेतकरी करीत आहेत.

नियम धाब्यावर
वाहिनी उच्च दाबाची असल्याने त्यासाठी सुमारे 3.5 ते 4 फुटापर्यंत खोदकाम करण्याची गरज असताना काही ठिकाणी तर 1-2 फुटांवरच वीजवाहिनीची ही केबल टाकून नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. या कामात अनेक त्रुटी असल्याने भविष्यात ही वीजवाहिनी प्रवाहित झाल्यास नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार आहे. त्यामुळे कंपनीविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.

Exit mobile version