| नागोठणे | प्रतिनिधी |
आपल्यासोबतच्या वकीलवर्गातून जेव्हा कुणी न्यायाधीश होतो, तेव्हा इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे ज्युनिअर वकिलांनी न्यायाधीश होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या नजरेतून न्यायाधीश हे डॉक्टरांबरोबर मानले जातात. न्यायाधीशपदावर काम करताना खूप त्याग करावा लागतो, स्वतःवर खूप बंधने ठेवावी लागतात. स्वतःसाठी एक लक्ष्मण रेषा आखावी लागते. आपल्या चांगल्यासाठीच या गोष्टी असल्याचे सांगून न्यायाधीशांचे वागणे हे प्रभू श्रीरामांसारखे असावे, असे प्रतिपादन रोहा न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश एस.एस. महाले यांनी केले.
रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने व अधिवक्ता परिषद रोहा शाखा यांच्या वतीने रोहा न्यायालयातील वकील बार रुममध्ये बुधवारी(दि.9) सायंकाळी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर संपन्न झालेल्या माणगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ विनोद घायाळ यांचे कुळ कायद्यातील तरतुदी यावर व्याख्यान व नवनिर्वाचित न्यायाधीश श्रेयस धनंजय धारप यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले, सह न्यायाधीश मेघा हासगे, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ आर.बी. सावंत, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव अॅड. श्रीराम ठोसर, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्षा मिरा पाटील, उपाध्यक्ष समीर सानप, सचिव मीनल मनोहर, सचिव महेश घायले, कोषाध्यक्ष दिनेश वर्मा, कार्यालयीन सहसचिव दिव्या सावंत, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य अॅड. प्रशांत वर्तक, अॅड. स्वराज मोरे, अधिवक्ता परिषद अलिबाग, संघटन सचिव अॅड. निकेत चवरकर, अधिवक्ता परिषद, अलिबाग तालुका सचिव अॅड. सचिन मकाणी, अधिवक्ता परिषद सेक्रेटरी अॅड. अभिजीत बागवे, अॅड. एम.के.शिंदे, अॅड.एस.ए.हाफिज, अॅड. श्रीकांत रावकर, अॅड. दीपक सोळंकी, अॅड. शंकर हारपाल, अॅड. फाल्गुनी ठक्कर, अॅड. जानकी कुलकर्णी आदींसह अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य व वकील यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अधिवक्ता मीनल मनोहर यांनी अधिवक्ता परिषद काय आहे व परिषदेचे कार्य कसे चालते याची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.