मृत्यूनंतर न्याय; प्राचार्यांना अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अनंत ठाकूर यांना ठाणे येथील फौजदारी न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयात काम करणार्‍या अनिल जगे यांना 2006 साली कामावरून निलंबित करण्यात आले होते. जगे यांना निलंबित करताना महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही चौकशी करण्याची तसदी न घेता अनिल जगे यांना जबरदस्तीने संस्थेच्या सचिवाला लेखी पत्र देण्यास भाग पाडण्यात आल्याचे जगे यांचे म्हणणे होते. आणि अत्यंत बेकायदेशीररित्या सदर पत्रात करण्यात आलेले सर्व आरोप मान्य आणि कबूल आहेत असे लिहून घेण्यात आले होते. याबाबत सहा वर्षांनंतर महाविद्यालयातल्या जन माहिती अधिकारी यांच्या नावाने माहिती विचारण्यात आली तेव्हा महाविद्यालयात जन माहिती अधिकारी या पदाची स्थापना करण्यात आली नव्हती. 2006 पासून जगे यांना निर्वाह भत्ता प्राप्त न झाल्याने कुपोषणामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला; परंतु मृत्यूपूर्वी त्यांनी महाविद्यालयाचा क्रूर अत्याचार आणि अन्याय ठाणे न्यायालयाच्या निर्देशास आणून दिला. वास्तविक, सन 2010 साली जगे यांना पूर्ववत कामावर घेऊन पूर्वीची 2006 पासूनची सर्व थकीत थकबाकी देण्याचा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, शिक्षण संस्थेने हा आदेश पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास नकार दिला, त्यामुळे न्यायालयाने प्रा. गणेश ठाकूर या आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाबद्दल जगे यांच्या जासई या गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले असून, जगे यांच्या पत्नी अनिता जगे यांनी दोन दशक न्यायालयात दिलेल्या लढ्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version