अनय सुपरकिंग्स संघ अंतिम विजयी
। पोयनाड । वार्ताहर ।
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ज्युनियर वयोगटातील मुलांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सच्या मैदानावर करण्यात आले होते, इंटर अकॅडमी ज्युनियर वयोगटातील चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत एकुण तीन संघांनी सहभाग घेतला होता. पीसीए इंडियन्स, लावास रॉयल्स आणि अनय सुपरकिंग्स अश्या तीन संघांचा स्पर्धेत सहभाग होता, अंतिम सामना लावास रॉयल्स विरुद्ध अनय सुपरकिंग्स संघांमध्ये झाला. त्यात अनय सुपरकिंग्स संघाने विजय मिळवत चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.
स्पर्धेचे आयोजन लिग व बाद फेरीनुसार केले होते. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणार्या रुद्र परदेशी याला मालिकावीर व उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून हार्दिक जाधव तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून सार्थक भोईर याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून लावास लुब्रिकन्ट्स, सुकाम हॉस्पिटल, स्पोर्ट्स बॉक्स व प्रदीप स्पोर्ट्स यांनी मोलाचे सहकार्य केले. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राजेश पाटील, शंकर दळवी, अँड.पंकज पंफीत, प्रशिक्षक सागर कांबळे, प्रतिक मोहिते, सुमेध कांबळे, पंच संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या सह खेळाडू व पालक उपस्थित होते.