कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुटाचा मान

। अलिगड । क्रीडा प्रतिनिधी ।

कुमार व कुमारी 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुटाचा मान मिळविला आहे. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस् स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कुमार गटाचे हे सलग 19 वे तर कुमारी गटाचे 10वे विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण 35वे तर कुमारींचे 26वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे.

शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली आहे. मुलींच्या गटात अश्‍विनी शिंदेच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर 24-20 असा 4 गुण व 5.10 मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी 14-10 अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्‍विनीला तन्वी भोसले, स्नेहा लामकाने, प्रणाली काळे यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे व प्राजक्ता बिराजदार यांनी दुसर्‍या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसर्‍या डावात प्रत्येकी चार खेळाडू टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान, लीसा राणी यांचे प्रयत्न अपुरे पडले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडीसावर 33-29 अशी 1.30 मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची 18-14 ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे, कृष्णा बनसोडे यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु, सुनील पात्रा यांची लढत अपुरी पडली.

दरम्यान, मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असो.चे पदाधिकारी पूर्णपणे पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केल आहे.

विशेष पुरस्काराने सन्मानित
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा ‘वीर अभिमन्यू’ पुरस्काराचा मानकरी जितेंद्र वसावे, तर सुहानी धोत्रे ही ‘जानकी’ पुरस्काराची मानकरी ठरली आहे. हे दोघेही धाराशिवचे आहेत. तसेच, आक्रमक खेळाडू प्रेम दळवी (सांगली), लीसा राणी (ओडीसा) तर संरक्षक खेळाडू बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले (धाराशिव) यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल
यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली आहे. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो. त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी 1 व मुलींनी 4 गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला.

ओडीसाच्या सरकारने खो-खोसह इतर खेळांना सुद्धा मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याकडे खेळाडुंमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ‘उच्च गुणवत्ता केंद्र’ सुरु केली आहेत. ओडीसामध्ये खो-खो हा नियमितपणे मॅटवर खेळला जातो. आपल्याकडे अजून अश्या सुविधा नसताना देखील दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या कल्पकतेने, योग्य नियोजन व तांत्रिक युक्त्या वापरून हे विजय खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर जिंकले आहेत.

– चंद्रजीत जाधव, प्र. कार्यवाह, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन

Exit mobile version