अर्बन बँकेच्या ठेवीदारांची पुन्हा आश्वासनावर बोळवण

| अलिबाग | प्रतिनिधी|

बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोंर आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. मात्र यावेळीही पालकमंत्र्यांकडून त्यांची आश्वासनावर बोळवण करण्यात आली. बँक बुडून 12 वर्ष झाली आहेत. तरीही अद्याप ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने ते परत मिळावे त्यासाठी हा संघर्ष सुरु आहे.

23 सप्टेंबर 2010 रोजी बँक बुडीत झाल्याचे समजल्यावर अनेकांचे स्वप्न हवेतच राहिले. बँकेत ठेवण्यात आलेली रक्कम मिळावी यासाठी ठेवीदार गेल्या 12 वर्षापासून लढा देत आहेत. जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयवर स्तरावर बैठका होत आहेत. मात्र फक्त आश्वासनेच मिळत आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक याबाबत झाली होती. ठेवीदारांच्या ठेवी वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची कार्यवाही अद्यापही झाली नाही.

रविवारी 30 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनशेहून अधिक ठेवीदारांनी आंदोलन पुकारले. पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ठेवीदारांनी त्यांची समस्या मांडली. ठेवीदारांचे 558 कोटी रुपये लवकरात लवकर वसूल करावे, ॲड. वैभव भोळे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, जप्त केलेल्या जमिनीवर असलेला ईडीचा बोजा उतरवून त्या जागेचा लिलाव करून ठेवीदारांना ठेवी मिळवून द्यावी, अशी मागणी पेण संघर्ष समितीकडून करण्यात आली. यावेळीदेखील मुख्यमंत्र्यासमवेत आठ दिवसात बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे ठेवीदारांची पुन्हा आश्वासनावर बोळवण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. यावेळी पेण संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष बिवरे, सचिव चिंतामणी पाटील, अनिल बोबाटे, रविंद्र धरणे, श्याम म्हात्रे, प्रदिप कदम, मोहन सुर्वे, प्रदीप शहा, धनंजय देशमुख यांच्यासह खोपोली, पेण, कर्जत, वावोशी, वडखळ, शिळफाटा येथील सुमारे दोनशेहून अधिक ठेवीदार उपस्थित होते.

बुडीत पेण अर्बन बॅँकेतील ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्या, जप्त केलेल्या जमीनी विकून त्यातून रक्कम ठेवीदारांच्या द्याव्या, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार जमले होते. पालकमंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे. येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. 1 लाख 68 हजार ठेवीदार असून 558 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे.

अनिल बोबाटे, सदस्य, पेण संघर्ष समिती
Exit mobile version