किशोर गट राज्य निवड चाचणी परभणीत

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व परभणी जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आणि साई क्रीडा मंडळ-खेडूला यांच्या विद्यमाने दि. 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत किशोर गट (मुलं/मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरी, जायकवाडी वसाहत येते 4 मातीच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळविण्यात येईल. या स्पर्धेतून 20-20 जणांचा मुले व मुलींचा संघ निवडण्यात येईल. यातून पुन्हा 12 जणांचा निवडण्यात आलेला संघ डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तराखंड येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.
या स्पर्धेत राज्य कबड्डी संघटनेला संलग्न असलेल्या 25 जिल्ह्याचे किशोर आणि किशोरी गटाचे संघ सहभागी होणार आहेत. या दोन्ही गटाकरिता वयाची अट 16 वर्ष(जन्म तारीख 01-01-2006 किंवा त्यानंतर) असून, वजन 55 किलोच्या आत असावयास हवे. राज्य संघटनेची ऑनलाईन नोंदणी झालेला आणि वय व वजनाच्या अटीत बसणारा खेळाडूच या स्पर्धेत खेळू शकतो. संबंधित जिल्हा संघटनांनी आपला प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरून दि.10 डिसेंबरपर्यंत राज्य संघटनेच्या संकेतस्थळावर पाठवावा. तसेच आपण स्पर्धेस्थळी कधी पोहचणार याची आगाऊ सूचना संयोजकांना द्यावी जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही. असे एका परिपत्रकाद्वारे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी कळविले आहे.

Exit mobile version