| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुका हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात अनेक नामवंत खेळाडू व बलाढ्य संघ आहेत. तसेच, युवकांचा भरणा असलेला तळाघर रोहा संघ पावसाळी मोसमी हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी पूर्ण ताकतीने उतरला असून दररोज चिखलात कसून सराव करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता फक्त कबड्डी डोळ्यासमोर ठेवून खेळाडू आपला कौशल्यला दाखवून चिखलामध्ये मेहनत करताना दिसत आहेत.
दरम्यान, धाटाव पंचक्रोशीसह तालुक्यात चांगल्या पद्धतीने खेळाचा प्रदर्शन तळाघर रोहा कबड्डी संघ करत आहे. या संघामध्ये सर्वच 17 ते 22 या वयोगटातील खेळाडू असून दररोज भविष्यसाठी एकीचे बळ दाखवत नियमित धावणे, वर्कआऊट करणे, व्यायाम करणे आणि शिस्तीचा व प्रेक्षणीय खेळ कसा होईल, या अनुषंगाने सर्व खेळाडू अविरतपणे मेहनत घेत आहेत. गतवर्षी या संघाने उत्तम कामगिरी केली होती. आगामी किशोर व कुमार गट निवड चाचणीत संघ पूर्ण ताकतीने उतरणार असून सर्व स्पर्धेत संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास देखील तळाघर रोहा संघाच्याखेळाडूंनी व्यक्त केला आहे.







