ग्रामपंचायतीवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप
| कर्जत | प्रतिनिधी |
कडाव गावातील शासनमान्य एसटी प्रवासी बस स्थानकावर झालेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण करणाऱ्यापैकी एकाने पत्रकाराला धमकी दिल्याबद्दल हा वाद आणखीणच चिघळला आहे. ग्रामसेवकांना 2 जुलैपर्यंत कारवाई करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. परंतु, यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे स्थानिक पत्रकारांनी 21 किंवा 22 जुलैपासून लाक्षणिक बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.
कडाव बसस्थानक हे सार्वजनिक वापरासाठी निश्चित करण्यात आले असतानाही, येथील विनोद पवाळी, रमेश पवाळी आणि उमेश ऐनकर यांनी या जागेवर अनधिकृतपणे दुकाने उभारल्याचा आरोप आहे. गेली दहा वर्षे स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या अतिक्रमण हटवून प्रवाशांसाठी जागा मोकळी करून देण्याची मागणी करत आहेत. 24 जून रोजी एका पत्रकाराला अतिक्रमण करणाऱ्यांपैकी विनोद पवाळीने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पत्रकार समाजात संताप पसरला आणि त्यांनी ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांच्याकडे जाऊन 2 जुलैपर्यंत कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पत्रकारांनी 3 जुलै रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवून 15 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सरपंच करुणा पवार आणि ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांनी 20 जुलैपर्यंत अनधिकृत संरचना हटवून बसस्थानकासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी हमी दिली. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
मात्र, 16 जुलै रोजी ग्रामपंचायतीने फक्त चार स्टील खुर्च्या ठेवून, त्यावर कडाव बस स्थानक असा फलक लावून अपूर्ण आणि दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली. अतिक्रमण अजूनही शाबूत असताना बस स्थानकाचा फलक बसवण्यात आल्याने पत्रकारांनी याला लोकांची फसवणूक करणारा उपाय म्हणून तीव्र निषेध केला आहे. या प्रकाराला विश्वासघात आणि दिशाभूल असे संबोधून पत्रकारांनी 21 किंवा 22 जुलैपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक बेमुदत उपोषण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी दि.18 जुलै रोजी तहसील कार्यालयात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कडावचे ग्रामसेवक, सरपंच, कर्जत एसटी आगार प्रमुख आणि पत्रकार यांची एक संयुक्त बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पाहणी करून कडाव गावातील शासकीय एसटी प्रवासी बस थांब्यातील अनधिकृत बांधकाम कर्जत एसटी आगार प्रमुख व कडावचे ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे कायदेशीर कारवाई करुन तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, कडाव ग्रामपंचायत व एसटी आगार प्रमुख यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तसेच, कायदेशीर कारवाईसाठी केलेल्या दिरंगाई बद्द्ल त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत.
अतिक्रमणाचा काही भाग हटवला गेला आहे. बाकी उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी नव्याने पत्र दिले जाईल. संपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि पत्रकारांनी उपोषण करावे, अशी वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रेमसिंग गिरासे,
ग्रामसेवक, कडाव
