| रसायनी | प्रतिनिधी |
सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे घरत यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘कोकणरत्न पदवी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. यावेळी स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘कोकणरत्न’ या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर यांच्यासह मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे खारपाडा गावचे पत्रकार कैलासराजे घरत यांना प्रतिष्ठेच्या ‘कोंकणरत्न पदवी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार कैलासराजे घरत यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे
कैलासराजे घरत पुरस्काराने सन्मानित
