बिल थकल्याने कळंब तलाठी कार्यालय अंधारात

महावितरणची कारवाई; जनसामान्यांची कामे खोळंबली
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत महसूल विभागाच्या कळंब येथील वारे तलाठी सजा, तसेच मंडळ अधिकारी कार्यालयातील विजपुरवठा महिनाभरापासून खंडित करण्यात आला आहे. सहा महिन्यांपासूनचे 23,827 रुपये वीज बिल थकल्याने महावितरणकडून विजपुरवठा खंडित करून मीटरही काढून नेण्यात आले आहे. परिणामी, या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, जनसामान्यांची कामे खोळंबली आहेत.

महसूल विभागाच्या वारे तलाठी सजा, तसेच कळंब मंडळ अधिकारी कार्यालय हे सहा महिन्यांपूर्वी कळंब येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्टोअरेज इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे वीज कनेक्शन थकीत वीज बिलामुळे यापूर्वीच महावितरणकडून खंडित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी तात्पुरता वीजपुरवठा घेण्यात आला होता.

दरम्यान, महावितरण कर्मचार्‍यांना ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी वीजपुरवठा खंडित करून विद्युत केबलही काढून नेण्यात आल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले. परिणामी, मागील महिन्याभरापासून या दोन्ही कार्यालयात वीजच नसल्याने लोकांच्या जमिनीसंदर्भात असलेली कामे खोळंबळी आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प आहे. लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी कामासाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी वारंवार फेर्‍या माराव्या लागत आहेत. मात्र, वीजच नसल्याने डिजिटल दस्तऐवज देण्यास अडचणी येत आहेत. कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर विजेअभावी वापरात नाही. परिणामी, कामकाज ठप्प झाले आहे. याचा फटका सर्वांना बसत आहे. महसूल विभागाने याबाबतीत लक्ष देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

विलास मिरगणे, तलाठी सजा वारे-पाषाणे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे 12 हजार 900 तर कळंब तलाठी कार्यालयाचे 23 हजार 827 रुपयांचे वीज देयक थकीत होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार वीजपुरवठा खंडित केला आहे. वीज देयकाची रक्कम भरल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

प्रमोद सांगळे, महावितरण विभाग कळंब
Exit mobile version