कळंब नळपाणी योजना रखडली

दोन वर्षे झाली तरी अर्धवटच


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायीमधील कळंब गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम गेली दोन वर्षे सुरु असून, अजूनही जेमतेम 30 टक्के काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे. संबंधित योजनेचे निविदा मिळविणाऱ्या ठेकेदाराला रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून योजनेचे काम पूर्ण व्हावे म्हणून नोटिसा देण्यात आल्यात. परंतु, संबंधित ठेकेदार कंपनीने त्यांना केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, दोन वर्षात योजनेचे काम रखडल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कळंब गावासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनमधून जून 2021मध्ये एक कोटी 90 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना मंजूर केली. चिल्हार नदीवरील सिमेंट बंधारा येथे असलेल्या विहिरीमधील पाणी उचलून त्याच भागातील टेकडीवर जलकुंभ बनवून ते पाणी कळंब गावाला पुरविण्याचे नियोजन असावे यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. मात्र, या योजनेचे काम ऑनलाईन निविदेमध्ये ज्या ठेकेदाराने मिळविले, त्या ठेकेदाराने योजनेचे कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर कळंब येथे येऊन जलवाहिन्या आणून जून 2021 मध्ये योजनेच्या कामाचे कार्यादेश प्राप्त झाल्यानंतरदेखील आजपर्यंत 50 टक्केदेखील पूर्ण झाले नाही. त्यात या योजनेचे काम जून 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.

नळपाणी योजनेच्या कामासाठी आणण्यात आलेल्या जलवाहिन्यादेखील पूर्णपणे जमिनीमध्ये टाकण्यात आले नाही. तर जलकुंभ बांधण्यासाठी केवळ खोदकाम करून ठेवले आहे. याशिवाय अन्य कोणतेही काम ठेकेदार कंपनीकडून केलेले नाही. या योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. मात्र, त्या मुदतीतदेखील संबंधित ठेकेदाराने या भागात कधीतरी येऊन लहानसहान कामे करून वेळकाढूपणा केला आहे. परंतु, काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे तब्बल अडीच वर्षांनंतरदेखील कळंब नळपाणी योजनेचे पाणी ग्रामस्थांच्या घरात काही पोहोचले नाही.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा काम चुकार ठेकेदारावर कारवाई करणार आहे की नाही, असा प्रश्न कळंब गावातील स्थानिक कार्यकर्ते शहजाद लॉगडे यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version