कळंबोली मॅकडोनाल्ड थांबा हलला

विस्तारिकरणाच्या कामासाठी स्थलांतर; अनेक व्यवसायिकांना आर्थिक फटका

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

प्रवाशांची होणारी गर्दी पाहून अनेक लहान मोठ्या विक्रेत्यांनी कळंबोली मॅकडोनाल्ड या राज्य परिवहन मंडळाच्या बस थांब्याच्या ठिकाणी आपले व्यवसाय थाटले होते. त्यामुळे दररोज या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत होती. आता मात्र हा थांबा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे. याचा परिणाम या ठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्याच्या व्यवसायांवर झाला असून, अनेकांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

सायन – पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलच्या विस्तारिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.तसेच, नवी मुंबई विमान तळावर जाणाऱ्या वाहणांची संख्या भविष्यात वाढणार आहे. त्याचा विचार करून कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी कळंबोली मॅकडोनाल्ड येथील थांबा के.एल.ई. कॉलेज येथे हलवण्याची मागणी राज्य परिवहन विभागकडे पत्राद्वारे केली होती. भोसले यांनी केलेल्या मागणीची दखल घेत हा हलवण्यात आला असून, 1 नोव्हेंबरपासून नव्या थांब्यावर बस थांबवल्या जात आहेत. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाकडून कळंबोली मॅकडोनाल्ड येथे बस प्रवाशांसाठी थांबा उपलब्ध करून देण्यात आला होता. या थांब्यावर दररोज जवळपास 75 शिवनेरी बस प्रवासी घेण्यासाठी थांबा घेत होत्या. तसेच, या ठिकाणी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक खाजगी वाहन देखील उभी राहत होती. रात्रंदिवस उभ्या राहणाऱ्या वाहणांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. दररोज थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने अनेक विक्रेत्यांनी आपले लहान मोठे व्यवसाय या ठिकाणी थाटले होते. थांबा इतरत्र हलवण्यात आल्याने या विक्रेत्यांना आता आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

वाहतूक पोलिसांकडून कारवाई
थांबा हलवण्यात आल्या नंतरही प्रवासी या ठिकाणी गर्दी करत असल्याने अनेक खाजगी बस चालक या ठिकाणी आपली वाहन थांबवत आहेत. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांडून अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. तर, वाहन उभी राहू नये या करता वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना खासगी मदतनीस देखील देण्यात आले असून, वाहनचालकांनी वाहन उभी करू नये, या करता लाऊडस्पीकरवरून सूचना देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत.
विक्रेत्यांची नव्या थांब्याकडे धाव
थांबा नव्या जागेत हलवण्यात आल्याने अनेक विक्रेत्यांनी नव्या थांब्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास नव्या बस थांब्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर चाप बसवण्याचे काम पालिकेच्या अतिक्रमण विभागाला करावे लागणार आहे.
Exit mobile version