पाणीटंचाईने कळंबोलीकर आक्रमक

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब; सिडको कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

कळंबोली वसाहतीत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सिडकोच्या कळंबोली कार्यालयात धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कळंबोलीतील विविध भागांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्याचा उद्रेक सिडको कार्यालयात होत आहे. नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांचा रोष लक्षात घेऊन सिडको कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थितीमुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना कार्यालयात येताना आणि बाहेर जाताना पोलिसांच्या गराड्यातून जावे लागत आहे. त्यामुळे कळंबोलीतील पाणीटंचाईचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त हा पाणीटंचाईवरील उपाय ठरू शकत नाही. नागरिकांना दिलासा देण्यासाठी सिडको प्रशासनाने पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. आता प्रशासन या प्रश्नावर कोणती कार्यवाही करते, याकडे कळंबोलीकरांचे लक्ष लागले आहे.

बंदोबस्त नव्हे, नियमित पाणीपुरवठा हवा!
पाण्यासाठी नागरिकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असेल, तर ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्तापेक्षा नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिडकोने पाणीटंचाईवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मनसेचे बेमुदत उपोषण
कळंबोली वसाहतीतील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. दि.6 ऑक्टोबर रोजी सिडकोच्या कळंबोली पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन घाडगे यांनी पाणीप्रश्नावर जाब विचारला होता. यावेळी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने सिडको कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांसह महिलांचाही पाठिंबा मिळत आहे.
Exit mobile version