। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली तसेच नावडे वसाहतीमधील नागरिक सद्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहेत. यामुळे त्रस्त नागरिकांनी कळंबोली येथील सिडको कार्यालय गाठले असून, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सणासुदीच्या काळात देखील पाण्याचा थेंब थेंब मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले असून, पाणी द्या, जगू द्या अशा घोषणा देत त्यांनी सिडको प्रशासनाचे लक्ष वेधले.
गेल्या काही महिन्यांपासून या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः नावडे परिसरातील प्लॉट नं. 29, रिद्धी-सिद्धी सोसायटी या ठिकाणी मागील वर्षभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. मोर्चानंतर सिडको प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल देवरे यांनी सांगितले की, कळंबोली सेक्टर 3 या भागात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच नावडे विभागासाठी स्वतंत्र 8 इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन करण्यात आले असून, काही दिवसांतच ही कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपाययोजनानंतर नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तथापि, नागरिकांनी सिडकोने ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणीही केली आहे.
नागरिकांच्या पाणी प्रश्नाची दाखल घेत लवकरच कळंबोली तसेच नावडे विभागातील पाण्याच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. भविष्यात नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रफुल्ल देवरे
सिडको पाणीपुरवठा विभाग कळंबोली







