उरण सामाजिक संस्था करणार निदर्शने
| उरण | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून खोपटा-कोप्रोली रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून मंजूर झाले आहे. मात्र, त्या कामात दिरंगाई केली जात असल्याने उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गुरूवारी (दि.16) सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या विरोधात खोपटा पुलाजवळील रस्त्यावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
खोपटा-कोप्रोली हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. उरण-पूर्व विभागात सीएफएस गोदामे व कंटेनर यार्डची वाढ झाल्यामुळे या रस्त्यावरून कंटेनर आणि इतर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे या मार्गावर मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच, अरूंद रस्ता त्यात कंटेनरची अवैध पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर काही कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. परंतु, ते काम निकृष्ट दर्जाचे निघाल्याने हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे.
दरम्यान, या रस्त्यासाठी काही महिन्यांपूर्वी निधी मंजूर झाला असून ठेकेदाराची देखील नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, आता पावसाळा जाऊन सुद्धा या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे प्रवासी वर्गाला खड्ड्यातून प्रवास तर करावा लागतच आहे, त्यात प्रचंड प्रमाणात धुळीचाही सामना करावा लागत आहे. एकंदरीत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे, यासाठी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास खोपटा पूलाजवळील रस्त्यावर निदर्शने केली जाणार आहेत. त्यात नागरिकांनी देखील मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन उरण सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.





