कळंबोलीकरांचा पाण्यासाठी पुन्हा टाहो

ठेकेदार गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर यांचा मनमानी कारभार
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर लागलीच कळंबोली परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तोडून नवीन बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला. यामध्ये पाण्याच्या टाक्या तर तोडल्या, मात्र नवीन टाक्या उभारण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडे वेळच उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांची क्रूर चेष्टा झाली असल्याचे समोर आले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टेंडर दिलेले ठेकेदार मनमानी काम करीत असून, त्यांच्यावर महापालिका प्रशासनाचा अंकुश दिसत नाही. त्यामुळे महापालिकेच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवित येथील महिलांनी पनवेल महानगरपालिकेत घुसून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कळंबोली जळेआळी येथील ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी केलेल्या उपोषणाचीसुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी क्रूर चेष्टा केल्याचे यानिमित्ताने समोर आले. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर जुनी नगरपालिका आणि नव्याने 29 गावांचा समावेश करून ही महापालिका स्थापन करण्यात आली. यामध्ये पनवेल शहरालगत असलेली गावे बाजूला सारून 29 गावे समाविष्ट करण्याचा डाव तत्कालीन भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. यासाठी स्थानिक आमदारांनी महापालिकेत भाजपची सत्ता निर्विवाद राहावी अशी रचना करणारी महापालिका समोर आणली. ज्यामुळे शहरालगत असणार्‍या विचूंबे, सुकापुर, करंजाडे आदी ग्रामपंचायती वगळण्यात आल्या. मात्र, ज्या ग्रामपंचायती बहुतांशी भाजपप्रणित होत्या, त्यांनाही देशोधडीला लावत सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात महापालिका सत्ताधारी आणि प्रशासन सफल ठरले आहे. कळंबोली परिसरात याबाबत अधिक ओरड निर्माण झाली आहे. या परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्यामुळे येथील शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व संपविण्यासाठी येथील स्थानिक भाजपचे नेते एकवटले आहेत. गेली चार वर्षे जनावरांना पिण्यासाठी आपण न देणारे पाणी हे लोक जनतेसाठी देत आहेत, त्यामुळे येथील जनतेची काळजी करण्याचा खोटा अट्टाहास भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला असला तरी येथील जनता मात्र खळवळून जागी झाली आहे. गेली चार वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करायला लावणारी महानगरपालिका नको, आम्हाला आमची नगरपालिकाच द्या, असा सूर येथील नागरिकांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर आणला आहे. कारण होते ते म्हणजे, गेले महिनाभर पनवेल महानगरपालिकेच्या गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चरने घेतलेल्या ठेक्यांची कामे अर्धवट ठेवली असल्याचा कळंबोलीकरांना बसलेला फटका, हेच मुख्य कारण मानले जात आहे.

पिण्यासाठी सांडपाणीमिश्रित पाणी
कळंबोली येथील जळेआळी परिसरात गेल्या काही महिन्याभरापूर्वी सांडपाणीमिश्रित पाणी पिण्यासाठी येत होते. मात्र, एक ते दीड महिन्यापूर्वी काम सुरू करून नंतर ते एक महिन्यापासून बंद करण्यात आले. येथील ग्रामस्थांच्या पाण्याच्या लाईन कट करण्यात आल्या आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा टाहो फोडण्यास महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाने भाग पाडले. यावेळी हेच पाणी जर मिडल क्लास सोसायटीमध्ये आले, तर येथील नागरीक लोकप्रतिनिधींसह सत्ताधारी नेत्यांना सोडतील का? असा सवाल यावेळी विचारण्यात आला.

Exit mobile version