| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने प्रथमच स्वयंभू हनुमान रहिवासी मंडळाच्यावतीने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा रविवारी (दि.29) पुणे-स्वारगेट येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, क्रीडाप्रेमी व सुधागड वासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. आयोजकांनी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाची सोय क्रीडाप्रेमींसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेचा अंतिम विजयी कालभैरव भार्जे हा संघ ठरला असून रोख रक्कम 31 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, द्वितीय क्रमांक आई सोमजाई माता गोमाशी या संघाने पटकावला असून त्यांना रोख रक्कम 21 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक उल्हास क्रीडामंडळ अंबोले व चतुर्थ क्रमांक ओम कालभैरव अपटवणे या दोन्ही संघांना रोख रक्कम 11 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू शुभम शिंदे, उत्कृष्ट चढाई सूरज मगर, उत्कृष्ट पक्कड ऋतिक सावंत, पब्लिक हिरो रोशन बयकर व उत्कृष्ट प्रेक्षक सुशील राठोड यांना देखील आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.






