मुरूडमध्ये कालेटी मासळीचा बाजार

मोठी मासळी नसल्याने खवय्यांची नाराजी

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने मुरुडच्या मासळी बाजारामध्ये सर्व प्रकारची मासळी उपलब्ध होत नाही. सध्या मुरूड मार्केटमध्ये निवड, शेलबेल, कोलंबी, कालेटी, बोईट, शिंगट्या, पालू अशी छोटी मासळी दिसून येत असली तरी यामध्ये कालेटी मासळीचे प्रमाण आधिक दिसून येत आहे. आवडती मोठी मासळी भरपूर दिवसांपासून मिळत नसल्याने मासळी खवय्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य मासळीचे भावदेखील वधारले असून, अधूनमधून जिताडा मासळीदेखील दिसून येते.

सर्वच खवय्यांना मटण, चिकन आवडतेच असे नसून, त्याकडे पर्याय म्हणून ते स्वीकारतात. बाहेरगावाहून पाहुणे मुरुडला आले की, पोटात गोळाच येतो. मासळीची फर्माईश केली जाते. प्रत्यक्षात पावसाळ्यात बंदीमुळे मासळीचे मोठी टंचाई असते. मुरूडला जाणे म्हणजे ताजी मासळी खाणे अशी पाहुण्यांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात सर्वच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा वेळी खाडीपट्यात पेरा, बोक्षी, डोल अशा विविध पद्धतीच्या जाळीने पकडलेल्या मासळीवरच मच्छिमारांची भिस्त असते. काळोख्या रात्री खाडीत चिंबोर्‍या पकडण्यासाठी कोळी युवक जात असतात. एकदरा खाडीत कालव काढण्यासाठीदेखील महिला उतरतात. महिलांची अधूनमधून अशी लगबग ओहोटी लागल्यावर दिसून येते. किमान तात्पुरता घरखर्च यातून ओढाताण करीत भागविता येऊ शकतो, शिवाय खवय्यांनादेखील काही प्रमाणात आधार होतो, असे कोळी युवक आणि महिलांनी सांगितले.

Exit mobile version